महामानवांचे विचार आत्मसात करा; तेच खरे अभिवादन – न्यायाधीश जोंधळे , वणी वकील संघात डॉ. आंबेडकर व महात्मा फुले जयंती उत्साहात

वणी :

महामानवांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे जीवनयापन करणे हेच त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन वणी येथील वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश श्री. पी. एस. जोंधळे यांनी केले.
वणी वकील संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना ते बोलत होते. यावेळी सह न्यायाधीश भोसले साहेब, सह न्यायाधीश बिरादर साहेब, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. वीरेंद्र महाजन, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. वसंतराव कवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
न्यायाधीश जोंधळे पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे कार्य कोणत्याही एका समाज किंवा जातपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी संपूर्ण समाजातील जातीय व सामाजिक विषमता दूर करण्यासाठी संघर्ष केला. मात्र सध्याच्या काळात या महामानवांना जात-धर्माच्या चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. असे झाल्यास त्यांच्या विचारांचे महत्त्व कमी होईल, त्यामुळे समाजाने त्यांच्या विचारांचा स्वीकार करून त्यानुसार आचरण करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी अॅड. वीरेंद्र महाजन, अॅड. वसंतराव कवाडे, अॅड. रेखा तेलंग, अॅड. अमोल टोंगे यांनी मनोगत व्यक्त केले. अटर्नी हितेश मजगवडी यांनी सादर केलेल्या भीम गीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी अॅड. वीरेंद्र महाजन यांनी डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जीवनावरील साहित्य वकील संघाच्या ग्रंथालयासाठी उपलब्ध करून देण्याची इच्छा व्यक्त केली, जेणेकरून वकिलांना कायद्याबरोबरच महामानवांच्या विचारांचा अभ्यास करता येईल.
कार्यक्रमाला वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अॅड. अमोल टोंगे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post