वणीतील कोळसा वाहतूक ठरतेय जीवघेणी; मनसेचा ४८ तासांचा अल्टिमेटम, वेकोलि व परिवहन विभागावर मनसेचा हल्लाबोल; ‘खळ्ळ-खट्याक’ पॅटर्नची चेतावणी

वणी / प्रतिनिधी :

वणी परिसरातील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या वणी नॉर्थ एरियामध्ये सुरू असलेली कोळसा वाहतूक आता स्थानिक नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा गंभीर आरोप होत असून, या जीवघेण्या वाहतुकीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी थेट राज्याच्या परिवहन मंत्र्यांना पत्र पाठवत कोळसा वाहतुकीतील नियमबाह्य प्रकार आणि आरटीओ विभागाच्या कथित भ्रष्ट कारभारावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच वेकोलि प्रशासनाला ४८ तासांचा अल्टिमेटम देत तातडीने कारवाई न झाल्यास ‘मनसे स्टाईल’ काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
वणी नॉर्थ एरियामध्ये कोळसा वाहतुकीसाठी वापरली जाणारी अनेक वाहने अत्यंत जीर्ण अवस्थेत असून त्यांच्याकडे वैध फिटनेस प्रमाणपत्र नसल्याचे समोर आले आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ व केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ चे उघड उल्लंघन करून ही भंगार वाहने रस्त्यावर धावत असल्याचे निदर्शनास आले आहे.
यासोबतच मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोडिंग सुरू असूनही स्थानिक उपप्रादेशिक परिवहन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरटीओ अधिकारी आणि कोळसा वाहतूकदार यांच्यातील आर्थिक हितसंबंधांमुळे नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई होत नसल्याचेही पत्रात नमूद आहे.
या प्रकारांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी भालर येथील नारायणा ओ.बी. कंपनीत एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
एकूणच, वेकोलि प्रशासन आणि परिवहन विभागाच्या हलगर्जीपणामुळे कोळसा वाहतूक करणारे ट्रक ‘चालते-फिरते मृत्यूचे सापळे’ बनल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाने पुढील ४८ तासांत सर्व जड वाहनांची फिटनेस तपासणी करून ओव्हरलोडिंगवर आळा घातला नाही, तर वणी नॉर्थ एरियात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे होणाऱ्या कोणत्याही परिणामांना परिवहन विभाग व वेकोलि प्रशासन जबाबदार राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
वणीतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मनसे ‘खळ्ळ-खट्याक’ पॅटर्न राबवण्याच्या तयारीत असल्याने या प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post