आशा कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले; आंदोलनाचा इशारा“

वणी :

आरोग्य सेवेतील महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या आशा कर्मचाऱ्यांचे शासन व प्रशासनाकडून प्रचंड शोषण होत असल्याचा गंभीर आरोप सीटू आशा संघटनेचे चंद्रपूर जिल्हा सचिव कॉ. अरुण भेलके यांनी केला. वणी येथील वसंत जिनिंग सभागृहात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.
“आशा स्वयंसेविका या गोंडस नावाखाली अत्यल्प मानधनावर अनेक कामे करून घेतली जात आहेत. एवढेच नव्हे, तर केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान न आल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून मानधनही मिळालेले नाही. त्यामुळे आशा कर्मचाऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे,” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कॉ. प्रिती करमणकर होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉ. ॲड. कुमार मोहरमपूरी, कॉ. अरुण भेलके, किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ. ॲड. दिलीप परचाके, जिल्हा सचिव कॉ. उषा मुरखे, कॉ. सरिता दानव व कॉ. परशुराम तोडासे उपस्थित होते.
यावेळी अखिल भारतीय किसान सभा, सीटू कामगार संघटना, आशा कर्मचारी युनियन (लाल बावटा) व अंशकालीन परिचर संघटनेच्या वतीने १९ ते २२ एप्रिलदरम्यान पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय असा लाँग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या मोर्चात वणी तालुक्यातील शेकडो आशा कर्मचारी सहभागी होऊन सुमारे १०० किमी पायी चालत आपल्या मागण्यांसाठी लढा देणार असल्याचा निर्धार कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला.
आशा कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये दर महिन्याच्या पहिल्या तारखेला नियमित मानधन देणे, वेतनचिठ्ठी देणे, गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित सर्वेक्षण मोबदला अदा करणे, कोरोना काळातील कामाचा २४ हजार रुपयांचा मोबदला देणे, मंजूर ग्रॅज्युएटीची अंमलबजावणी करणे, तसेच सहा महिन्यांपासून रखडलेले वेतन तात्काळ देणे यांचा समावेश आहे. याशिवाय कोणताही शासन निर्णय नसताना जबरदस्तीने बीएलओचे काम देऊ नये, अशीही मागणी करण्यात आली.
जिल्ह्यातील हजारो आशा कर्मचारी या लाँग मार्चमध्ये सहभागी होणार असून शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यशाळेचे संचालन कॉ. मीनाक्षी थेरे यांनी केले. प्रास्ताविक कॉ. उषा मुरखे यांनी मांडले तर आभार कॉ. ताई डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमाला वणी तालुक्यातील अनेक आशा कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post