वणी/प्रतिनिधी :
वणी शहरात ‘दिवस व रात्र कालीन वणी प्रीमियम लीग – मनसे चषक २०२६’ (सीजन-३) या भव्य क्रिकेट स्पर्धेचा जल्लोषात शुभारंभ झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते शासकीय मैदानावर अतिषबाजीच्या दिमाखात पार पडले.
ग्रामीण भागातील तरुण खेळाडूंना त्यांच्या क्रीडागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी संघांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आल्यामुळे खेळाडूंमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे विजयराव मुकेवार उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी आमदार संजय देरकर यांनी मनसेच्या या उपक्रमाचे तसेच राजू उंबरकर यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत, ग्रामीण युवकांना खेळासाठी संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. त्यांनी सर्व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला मनसे वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष इरशाद खान, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष रमेश पेचे, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर, गोविंदराव थेरे, व्यापारी सेनेचे शहराध्यक्ष राकेश वैद्य, दिलीप मस्के, विलन बोदाडकर, राजू बोदाडकर, अविनाश पाटील, रवि आंबटकर, महेश हातगावकर, संजय गौरकर, मयूर घाटोळे तसेच आयोजक समितीचे शैलेश ढोके, नदीम शेख यांच्यासह क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आता पुढील काही दिवस वणीकरांना दिवस-रात्र क्रिकेटच्या रोमांचक सामन्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे.