पोलीस कलावंत शेखर वांढरे यांच्याशी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा मनमोकळा संवाद

वणी / प्रतिनिधी :

कलेच्या माध्यमातून समाजसेवा करणाऱ्या कलावंतांच्या आयुष्यात कधी कधी अनपेक्षित आनंदाचे क्षण येतात. असाच एक अविस्मरणीय प्रसंग वणी येथील पोलीस दलात कार्यरत वारली चित्रकार शेखर वांढरे यांच्या वाट्याला रविवारी (१२ एप्रिल) आला.
यवतमाळ जिल्ह्यातील शेखर वांढरे, जे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असून वारली चित्रकलेचे अभ्यासक आहेत, यांच्याशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मनमोकळा संवाद साधला.
डॉ. भागवत हे तेलंगणातील कुंदकुर्ती येथून परतताना पांढरकवडा येथील संघ कार्यालयात मुक्कामी होते. रविवारी सकाळी विविध कार्यकर्त्यांशी भेटीगाठी सुरू असताना, स्थानिक परिचितांच्या माध्यमातून शेखर वांढरे यांची त्यांच्याशी भेट घडवून आणण्यात आली.
प्रारंभी पोलीस दलातील जबाबदारीमुळे शेखर वांढरे थोडे संकोचले होते. मात्र प्रत्यक्ष भेटीनंतर वातावरण अत्यंत आपुलकीचे झाले. परिचयानंतर डॉ. भागवत यांनी विदर्भात वारली चित्रकलेवर काम करणाऱ्या कलाकाराबद्दल आश्चर्य व्यक्त करत आनंदही व्यक्त केला.
या संवादात त्यांनी वारली चित्रकलेचे प्रशिक्षण कुठे घेतले, त्याचा प्रसार कसा केला जातो आणि विदर्भात ही कला अधिक कशी रुजवता येईल, यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
शेखर वांढरे यांनीही वारली चित्रकला हा आपला छंद असल्याचे सांगत, मोकळ्या वेळात मुलांना मोफत प्रशिक्षण देणे व वर्ग आयोजित करणे असे उपक्रम राबवत असल्याची माहिती दिली. तसेच निवृत्तीनंतर या कलेच्या प्रसारासाठी अधिक वेळ देण्याचा मानस व्यक्त केला.
डॉ. मोहन भागवत यांनी त्यांच्या या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहित केले.
या भेटीबद्दल बोलताना शेखर वांढरे यांनी “सरसंघचालकांची सहज, आपुलकीची वागणूक आणि कलावंतांबद्दल असलेला जिव्हाळा अनुभवायला मिळाला. हा क्षण आयुष्यातील अविस्मरणीय ठरेल,” अशी भावना व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post