वणी :
येथील नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 7 मध्ये विद्यार्थिनींसाठी दिनांक 6 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान ‘राणी लक्ष्मीबाई आत्मसुरक्षा योजना’ अंतर्गत आत्मसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींना प्रतीक्षा खंडाळे व मानसी रंदाडे यांनी प्रीती बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वसंरक्षणाचे विविध धडे दिले. सध्याच्या परिस्थितीत मुलींनी आत्मसंरक्षणाचे कौशल्य आत्मसात करणे अत्यंत आवश्यक असल्याने शासनाच्या या योजनेद्वारे शहरी भागातील विद्यार्थिनींना सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थिनींना जुडो, कराटे तसेच विविध आत्मसंरक्षणाच्या तंत्रांचा प्रत्यक्ष सराव करून घेण्यात आला. अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगांना धैर्याने सामोरे जाणे आणि आत्मविश्वास वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
हा उपक्रम शाळा व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने मुख्याध्यापक गजानन कासावार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष किशोर चांदेकर, ज्येष्ठ शिक्षक चंदू परेकर, शुभांगी वैद्य, मंगला पेंदोर, विजय चव्हाण, दिगंबर ठाकरे आदी शिक्षकांनी उपस्थित राहून विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत नियमितपणे विविध शालेय व सहशालेय उपक्रम राबविले जात असून, विद्यार्थ्यांना सक्षम व आत्मविश्वासी बनविण्यावर विशेष भर दिला जात आहे.