वणी :
वणी शहरातील बाकडे पेट्रोल पंपाजवळ संजय ऑटोमोबाईल दुकानासमोर घडलेल्या घटनेत पैशांच्या वादातून एका तरुणाने आपल्या मित्राचा निर्घृण खून केल्याची घटना दिनांक 18 फेब्रुवारी ला रात्री सुमारे 9.30 वाजता उघडकीस आली. या प्रकरणी वणी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी राजेश संजय नेरकुंटलावार (वय 22, व्यवसाय मजूर, रा. दामलेफेअर, वणी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मंगेश उर्फ भुऱ्या विलास डाखरे (वय 26, रा. पळसोनी, वणी) व फिर्यादीचे मोठे भाऊ मल्लेश संजय नेरकुंटलावार (वय 24) हे एकमेकांचे जिवलग मित्र होते. काही दिवसांपूर्वी दोघे पश्चिम मध्यप्रदेश येथे फिरायला गेले होते. त्या वेळी मल्लेश यांनी मंगेश याला ₹7,000/- दिले होते. सदर रक्कम खर्च केल्यानंतर ती परत देण्यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. दुपारी झालेल्या वादात दोघांनी एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.
रात्री सुमारे 9.30 वाजता राजेश हे बालाजी ट्रॅव्हल्स कार्यालयात कामावर असताना त्यांना नातेवाईक रितिक लक्ष्मण मामीडवार यांचा फोन आला की, मंगेश उर्फ भुऱ्या हा संजय ऑटोमोबाईल दुकानासमोर मल्लेशला मारहाण करत आहे. घटनास्थळी पोहोचल्यावर राजेश यांनी पाहिले की आरोपीने लोखंडी सळईने मल्लेश यांच्या डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. नागरिकांची गर्दी होताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
पोलीस कारवाई
माहिती मिळताच पोलिस कर्मचारी सचिन वांढरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मल्लेश यांना त्वरित सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी मंगेश उर्फ भुऱ्या विलास डाखरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीस अटक केली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी (PCR) मंजूर केली आहे.
मार्गदर्शन व पथक
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) श्री. सुरेश दळवे व पोलीस निरीक्षक श्री. गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात API प्रियंका चौधरी, कपील पाटील, दत्ता पेंडकर, PSI सुयोग महापुरे, सुदाम आसोरे, शुभम महानवर तसेच वणी पोलीस स्टेशनचे इतर कर्मचारी सहभागी होते.
सदर प्रकरणाचा पुढील तपास API प्रियंका चौधरी या करीत आहेत.