संत रविदास महाराज जयंतीनिमित्त वणीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

वणी :

समतेचे अग्रदूत, थोर समाजसुधारक व मानवतेचा संदेश देणारे संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त वणी येथे १४ व १५ फेब्रुवारी रोजी विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजात समता, बंधुता आणि मानवतेचा विचार रुजविण्याच्या उद्देशाने हा जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय चर्मकार महासंघ, वणी, श्री संत रविदास महाराज समाज सुधार मंडळ, वणी तसेच श्री संत रविदास महाराज प्रबोधन केंद्र, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जयंतीनिमित्त शनिवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी शिवव्याख्यात्या युवा कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता ए.एस.एल. लॉन, एस.पी.एम. शाळेमागे, वणी येथे आयोजित करण्यात आला आहे. या कीर्तनातून संत विचार, सामाजिक जागृती तसेच अध्यात्मिक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
तसेच रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संत रविदास महाराजांच्या मूर्तीला हार व पुष्प अर्पण करून अभिवादन कार्यक्रम श्री संत रविदास महाराज प्रबोधन केंद्र, वणी येथे संपन्न होणार असून भव्य जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमांना समाजबांधव, महिला, युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संत रविदास महाराज जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post