सुगंधित तंबाखू तस्करी प्रकरणात पोलिसांची दिरंगाई ,गुन्हा दाखल मात्र आरोपी मोकाट;अन्यथा... 26 जानेवारी ला तहसील समोर धरणे आंदोलन , अजिंक्य शेंडे यांचा प्रशासनाला इशारा...

वणी /

वणी येथील सुगंधी तंबाखू तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल होऊन एक महिना उलटूनही आरोपींना अटक केली नाही. तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन अद्याप जप्तही केले नाही, त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांना स्मरणपत्र देत सात दिवसांत कारवाई न झाल्यास 26 जानेवारी रोजी वणी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी याबाबत लेखी तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी यांनी चौकशी अहवाल सादर केला असला तरी, प्रत्यक्षात आरोपी अद्याप मोकाट फिरत असून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीत नमूद आरोपी 8 डिसेंबर 2025 पासून खुलेआम वावरत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर तंबाखू तस्करी प्रकरणात प्रत्यक्ष वापरण्यात आलेले MH-24-BL-7051 क्रमांकाचे वाहन अद्याप जप्त करण्यात आलेले नाही. त्यामुळे तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपास सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी कारवाई मात्र शून्य असल्याने दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

युवासेनेच्या वतीने संबंधित आरोपींना तात्काळ अटक करणे, गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करणे तसेच तपासात दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.

या मागण्यांची पूर्तता सात दिवसांत न झाल्यास 26 जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post