वणी :- विशाल ठोंबरे
वणी नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस वाढत असून माळी पुरा परिसरातील राजकीय समीकरणांनी निवडणुकीची रंगत आणखीनच वाढवली आहे. स्थानिक पातळीवर नेहमीच सक्रिय राहून शिवसेनेचे अनेक वर्षे निष्ठेने काम केलेले सचिन अरुण पाटील यांना पक्षाकडून अपेक्षित उमेदवारी न मिळाल्याने अखेर त्यांनी प्रभाग - ७ ब मधून अपक्ष उमेदवारीचा निर्धार केला आहे.
पक्षाच्या तिकीट जाहीरनाम्यानंतर या प्रभागात मोठी खळबळ उडाली असून सचिन पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे या मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होत आहे. स्थानिक पातळीवर पाटील यांची जनसंपर्क शक्ती, समाजकार्यातील सक्रियता आणि वर्षानुवर्षे केलेली पक्षनिष्ठा लक्षात घेता त्यांच्या निर्णयाने प्रभागात निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर पाटील यांच्या या निर्णयाकडे समर्थकांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली असून 'स्थानिकांना न्याय मिळावा यासाठी ते रिंगणात उतरल्याचे समर्थकांचे मत आहे. प्रभागातील मतदारांच्या मनाचा कौल कोणाला मिळतो हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.