वणी /
जसजशी पालिका निवडणुक जवळ येत आहे तसतशी थंडीतही राजकीय गर्मी वाढत असल्याचे दिसून येत आहे. कारण ऐन पालिका निवडणुकीची धामधूम सुरु असताना कॉंग्रेच्या दोन शहराध्यक्षांनी राजिनामा दिल्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.
शहरातील कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा शामाताई तोटावार आणि कॉंग्रेस शेवादलाचे शहराध्यक्ष प्रमोद लोणारे यांनी अचानक राजीनामा दिल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
स्व. सतिशबाबू तोटावार यांनी नगराध्यक्ष पद भूषविले होते. तसेच त्यांनी काँग्रेसला वणी सह परिसरात भक्कम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती त्यांचीच पत्नी काँग्रेसच्या शहराध्यक्षा शामाताई सतिष तोटावार यांनी आरोग्य आणि कौटुंबिक कारणांचा उल्लेख करत पदाचा राजीनामा दिला. तर प्रमोद गोकुल लोणारे, जे 2006 पासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत आणि 2019 पासून वणी शहर सेवादल अध्यक्ष पद भूषवत होते, त्यांनीही निवडणुकीच्या तोंडावर अचानक पदाचा राजीनामा सादर केला.
या दोन्ही राजीनाम्यांमुळे वणी पालिकेतील काँग्रेसची निवडणूकपूर्व समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षातील अंतर्गत वाद, जागावाटपात स्थानिक नेतृत्वाला विश्वासात न घेणे हीच या विस्फोटक राजीनाम्यांची मुख्य कारणे असल्याची चर्चा सुरु आहे.