शिवसेना (शिंदे) पक्षाने केली नगराध्यक्ष पदाच्या नावाची घोषणा, भरगच्च कार्यक्रमात कुमारी पायल तोडसाम यांच्या नावावर शिक्कामोर्तब

वणी :

 शिवसेना (शिंदे) पक्षाचे लक्ष "मिशन नगरपरिषद २०२५ फक्त" या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी रात्री ९:३० वाजता वणीच्या एस.बी. लॉन सभागृहात करण्यात आले होते. थंडीच्या उसळत्या उत्साहात प्रचंड गर्दी, घोषणांचा गजर आणि भगव्याच्या लाटेमुळे सभेला विजयी जल्लोषाचे स्वरूप प्राप्त झाले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती, तर पुरुष कार्यकर्त्यांनीही सभेला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. या भरगच्च कार्यक्रमात नगराध्यक्ष पदासाठी कुमारी पायल यशवंत तोडसाम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजराने त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर या भरगच्च सभेत शिवसेना नेत्यांनी शहरातील नागरिकांना मिळत नसलेल्या मुलभूत सुविधा हा मुद्दा घेऊन नगर पालिकेवर सत्ता भोगणाऱ्या विरोधकांवर जोरदार तोफ डागत पाणी प्रश्न, अतिरिक्त लादलेल्या करांचे धोरण आणि जनतेला भेडसावणाऱ्या अनेक मुद्द्यांवर विरोधकांचे अपयश भरभरून उघड केले. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर अपयशी ठरलेल्या विरोधकांना सभेतून जोरदार खडे बोल सुनावण्यात आले.
*“वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घराघरात पोहोचवा ”*

सभेत शिवसैनिकांना प्रेरणा देताना हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची महती सांगण्यात आली. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने शिवसेना अधिक बळकट होत असल्याचे नेत्यांनी सांगितले.

“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपल्या लाडक्या बहिणींसाठीची तळमळ”

शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची “शिवसेनेच्या भगिनींसाठी असलेली जिव्हाळ्याची तळमळ” विशेषतः अधोरेखित करण्यात आली. आपल्या पाठीशी राज्याचे उपमुख्यमंत्री , जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना संजय राठोड वणी शहरासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या पाठीशी असल्याने त्याच भावनेतून वणी नगरपरिषदेत भगवा झेंडा फडकवण्यासाठी सर्व प्रभागात एकदिलाने सज्ज व्हावे, कोणावरही टीका टिप्पणी न करता आपले मिशन नगरपरिषद २०२५ कडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन करून निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले.

*शेकडो नागरिकांचा पक्षप्रवेश*

शिवसेना (शिंदे) पक्षाचे जिल्हा संघटक विजय चोरडिया, हरिहर लिंगमवार, विनोद मोहितकर, सौ किरण ताई विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी या भव्य सभेत शिवसेना (शिंदे) पक्षामध्ये जाहीर प्रवेश करुन घेतला. यावेळी थंडीतही शिवसैनिकांत उत्साह संचारला होता. जय भवानी जय शिवाजी यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

*आज सोमवारी नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी नामांकन दाखल करणार*

या सभेनंतर सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सोमवारी १७ नोव्हेंबर ला एकाच दिवशी नामांकन दाखल करणार असल्याची घोषणा करण्यात आली. सोमवारी दुपारी १२ वाजता श्री रंगनाथ स्वामी मंदिरातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे ती रॅली काठेड चौक, सर्योदय चौक, टागौर चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, टिळक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून तहसील कार्यालयात पोहोचणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक जवळ रॅली पोहोचेल तिथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून त्यानंतर रॅलीचा समारोप जैताई माता मंदिरात होणार आहे.

सभेला शिवसेना (शिंदे) पक्षाचे जिल्हा समन्वयक हरिहर लिंगमवार, जिल्हा संघटक विजय चोरडिया, विनोद मोहितकर, सुनिल नांदेकर, सौ. किरणताई विश्वास नांदेकर, विक्रांत चचडा, शुभम गोरे, मारेगाव तालुका अध्यक्ष विशाल किन्हेकर, पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद ठाकरे यांनी केले तर सभेचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post