वणी /
नगरपरिषद निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले असून नामांकनासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी तर्फे आज रविवारी प्रचंड उत्साहात आणि मोठ्या शक्तीप्रदर्शनासह नगराध्यक्ष पदासह २९ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या वतीने सौ.विद्या खेमराज आत्राम यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताच निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली आहे.
रविवारी सकाळपासूनच श्री रंगनाथ स्वामी मंदिर परिसरात उत्साह शिगेला पोहोचला होता. रॅलीत सहभागी होण्यासाठी नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकत्यांचा मोठा जनसमुदाय जमा झाला. धार्मिक वातावरणात श्री रंगनाथ स्वामी मंदिरात दर्शन घेऊन रॅलीची सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या निनादात वाजत-गाजत निघालेल्या या रॅलीतील लाडक्या बहिर्णीचे उत्साही शक्तीप्रदर्शन विशेष आकर्षण ठरले.
या शक्ती प्रदर्शन रॅलीमध्ये माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी, विजय पिदुरकर, दिनकर पावडे, जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलुरकर, संजय पिंपळशेंडे, ऍड. कुणाल चोरडिया, गजानन विधाते, श्रीकांत पोटदुखे, अंकुश बोढे, संतोष डंभारे, अनुराग काठेड,
यांच्यासह अनेक मान्यवर, महिला-पुरुष कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
श्री रंगनाथ स्वामी मंदीरातून निघालेली रॅली प्रथम काठेड चौक, सर्योदय चौक, टागौर चौक येथे रविंद्रनाथ टागोर त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले त्यानंतर आंबेडकर चौकात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून टिळक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली तहसील कार्यालयाकडे रवाना झाली. तहसील कार्यालयात पोहोचताच सर्वांचे लक्ष अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेवर खिळले. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, दिनकर पावडे, विजय पिदुरकर, संजय पिंपळशेंड, ऍड निलेश चौधरी इत्यादींच्या उपस्थितीत सौ विद्या खेमराज आत्राम यांनी नगराध्यक्ष पदासाठी तर २९ नगर सेवक पदांसाठी अधिकृतरीत्या उमेदवारी अर्ज दाखल केले.
निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कुमार हिंगोले, आणि सहायक निर्णय अधिकारी निखिल धुळधर यांनी अर्ज स्वीकारताच घोषणाबाजीचा आणि शुभेच्छांचा जल्लोष उसळला. त्यानंतर आज १६ तारीख असल्याचे निमित्ताने वणी- वरोरा मार्गावरील जगन्नाथ बाबा मंदिर येथे रॅली पोहोचली तेव्हा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री हंसराज अहिर उपस्थित झाले होते त्यानंतर श्री जगन्नाथ महाराजांचे दर्शन घेऊन रॅलीचा समारोप झाला.