वणीच्या राजकारणात नवा ट्विस्ट – वडील आणि मुलगा समोरासमोर!

वणी /

वणी शहराच्या राजकारणात एक वेगळीच रंगत निर्माण झाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वडील आणि मुलगा हे दोघेही वेगवेगळ्या पक्षातून राजकारणात सक्रीय होणार असल्याने वणीकरांमध्ये या नव्या समीकरणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

वणीतील ज्येष्ठ समाजसेवक आणि स्थानिक पातळीवर सक्रिय असलेले श्री. विजय परसमल चोरडिया यांनी नुकतेच शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करून पक्षविस्ताराच्या कामात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्यांचे सुपुत्र, अ‍ॅड. कुणाल विजय चोरडिया, हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून गेल्या काही वर्षांपासून वणी तालुक्यात विविध सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम राबवत आहेत.

या घडामोडीमुळे वणी शहरात राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. नागरिकांमध्ये “वडील आणि मुलगा वेगवेगळ्या पक्षातून निवडणुकीच्या रणांगणात उतरतील का?” अशी उत्सुक चर्चा रंगली आहे.

*आमचं ध्येय एकच - समाजसेवा आणि विकास.*

या संदर्भात अ‍ॅड. कुणाल चोरडिया म्हणाले, “राजकारण ही विचारधारेची लढाई आहे. आमचं ध्येय एकच — समाजसेवा आणि विकास. वडिलांचा निर्णय मला मान्य आहे, पण माझी निष्ठा भाजपाशी आणि जनतेच्या विकासाशी कायम राहील.”

आगामी निवडणुकांमध्ये या “वडील–मुलगा” जोडीची राजकीय भूमिका आणि जनतेचा प्रतिसाद पाहणे निश्चितच रोचक ठरणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post