स्वप्निल राऊत हत्या प्रकरणात दोन जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

वणी /

वणी शहरात घडलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा वणी पोलीसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला होता. या हत्या प्रकरणी शनिवारी दोन जणांना अटक करण्यात आली होती. या दोनही आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. स्वप्निल किशोर राऊत(२६) रा. रंगनाथ नगर वणी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या मध्ये सुमेश रमेश टेकाम (२४) आणि सौरभ मारुती आत्राम (२७) दोघेही रा. वडजापूर ता. वणी असे संशयीत आरोपी आहे.

गुरुवारी झाली होती हत्या -

मुख्य संशयित आरोपी असलेल्या सुमेश रमेश टेकाम याचे मृतक स्वप्नीलच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. स्वप्नील राऊत त्याच्या पत्नीला मारहाण करायचा. यामुळे सुमेश स्वप्नीलवर राग धरुन होता. गुरुवारी दुपारी ४.३० वाजता सुमेश आणि सौरभ दुचाकीवरून जत्रा मैदानावर पोहोचले. तेथून त्यांनी स्वप्नीलला फोन केला. दारू पिण्याच्या बहाण्याने तिघेही दुचाकीवर बसले आणि वरोरा रोड रेल्वे क्रॉसिंग, संविधान चौक मार्गे वडगाव मार्गावरील गजानन नगरी येथे पोहोचले. वाटेत सुमेशने एका वाईन शॉपमधून दारू खरेदी केली.
दारू पार्टी दरम्यान, आरोपींनी स्वप्नीलला जाणूनबुजून जास्त दारू पाजली. त्यानंतर आरोपी सुमेशने एक मोठा दगड घेतला आणि स्वप्नीलच्या डोक्यावर मारला. दगडाने मारल्यानंतर स्वप्नील वाचू नये म्हणून आरोपींनी दारूची बाटली फोडली आणि स्वप्नीलचा गळा चिरला. स्वप्नीलची हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी त्यांच्या दुचाकीवरून पळून गेले. ही हत्या पोलिसांसाठी आव्हान बनली होती. परंतु फॉरेन्सिक रिपोर्ट आणि तांत्रिक तपास तयार केल्यानंतर पोलिसांनी २४ तासांच्या आत सुमेश रमेश टेकाम (२४) आणि सौरभ मारुती आत्राम (२७) दोघेही रा. वडजापूर ता. वणी या दोन्ही संशयीत आरोपींना अटक केली होती. 
दरम्यान आज रविवारी वणी पोलीसांनी या दोन्ही संशयीत आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post