पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर झाला गोळीबार, एक इसम जखमी, पुसद येथील घटना

पुसद (प्रतिनिधी वसीम खान):

  शहरात परत एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील वसंत नगर मधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलीस प्रशासन परत एकदा अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे याचे कारण म्हणजे दिनांक 8 ऑगस्ट ला रात्री 10.30 वाजताचे सुमारास पोलीस स्टेशन वसंत नगर यांच्या हाकेच्या अंतरावर गोळीबार झाला. यां गोळीबारात एक इसम जखमी झाला आहे. 

 पुसद शहरातील वसंत नगर मधील निसार टेलर मार्ग गल्ली नंबर 4 येथे गोळीबार करण्यात आला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नामे हसन खान अजीज खान वय अं. 35 वर्षे याचा मावस भाऊ व शेख साहिल शेख वजीर यां दोघांमध्ये फुटबॉल खेळण्याचे कारणावरून वाद झाला व हा वाद विकोपाला गेल्याने शेख साहिल शेख वजीर याने त्याचे इतर साथीदारासोबत मिळून फिर्यादीचे घरासमोर येऊन रात्री बंदूकीने गोळीबार केला. यां घटनेत फिर्यादीचे वडील अजीज खान फतेह खान वय अं. 52 वर्षे हे जखमी झाले. त्यांच्या डाव्या बाजूच्या पोटाच्या वर गोळी लागून गेल्याने त्यांचा जीव वाचला. यानंतर फिर्यादी नामे हसन खान अजीज खान याने पोलीस स्टेशन वसंत नगर पुसद येथे जाऊन आरोपी विरुद्ध तक्रार दिली. त्या तक्रारीवरून आरोपी नामे शेख साहिल शेख वजीर वय अं. 24 वर्षे रा. मुलतानी तांडा पुसद, रियाज उर्फ रम्मू अहमद पठाण वय अं. 28 वर्षे रा. मोमीनपुरा मुलताणवाडी, मोहम्मद आवेश उर्फ टिंडा मोहम्मद नजीर वय अं. 27 वर्षे रा. बेंडकीपुरा वसंत नगर पुसद व जुनेद शेखा रफिक शेखा वय अं. 24 वर्षे रा. सहारा पार्क पुसद यांच्या विरुद्ध बी एन एस चे कलम 109(1), 351(2), 351(3), 296, 3(5) तसेच आर्म ऍक्ट 3(25) व सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार आहेत. सदरची घटना ही अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे व ही घटना पोलीस स्टेशन वसंतनगर यांच्या काही हाकेच्या अंतरावर घडली आहे यावरून आता वसंतनगर मध्ये कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता पोलिसांनी यां घटनेतील आरोपीना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे सदरची घटना ही दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 10.30 वाजता घडली असताना त्या घटनेचा घटनास्थळ पंचनामा मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे आज दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12.30 वाजताचे सुमारास करण्यात आला. सदर घटनेनंतर आज सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक वसंत नगर पुसद सतीश जाधव, पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे पोलीस स्टेशन पुसद शहर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडगे, पोलीस उपनिरीक्षक आवळकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

Post a Comment

Previous Post Next Post