वणी /
वणी पोलीस स्टेशन हद्दीतील एमआयडीसी परिसरातील भालर रोड वरील तेल वाळू नाल्याजवळ एक मानवी सांगाडा मिळून आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत वणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. ही घटना बुधवारी (ता.२०) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.
पोलिसांकडून मिळालेल्या
माहितीनुसार एका नागरिकाला भालर रोड वरील तेल वाळू नाल्याजवळ एक मानवी कवटी दिसून आली. याबाबतची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता त्यांना एक मानवी सांगाडा मिळून आला. पोलिसांनी मानवी सांगाडा ताब्यात घेतला. या मानवी सांगड्याची वैद्यकीय तपासणी केल्यावरच तो स्त्री किंवा पुरुषाचा आहे ते समजण्यास मदत मिळणार आहे. मात्र त्या सांगाड्याजवळ एक प्रिंटेड साडी, डोक्याचे केस आणि तुटलेली प्लास्टिक ची बांगडी आढळून आल्याने हा मानवी सांगाडा महिलेचाच असावा असा कयास बांधला जात आहे.
अधिक तपास पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर , पोहेकॉ/ राजु देढे करत असुन कुणाला काही माहिती मिळाल्यास ८७८८५७७८४०, ७४१०५२२२५१ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.