चमत्कार नव्हे तर तत्त्वचिंतन काळाची गरज- डॉ. सत्पाल सोवळे

वणी /

"मूळ वैदिक साहित्यात आणि त्यातही प्रामुख्याने उपनिषदांमध्ये कुठेही चमत्कारांना धारा नाही उलट त्यामध्ये अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारच्या आत्मस्वरूपचिंतनाचे वर्णन करण्यात आलेले असून मध्यंतरीच्या पौराणिक काळात श्रोत्यांच्या क्षमतांचा विचार करीत अशा काही कथा जरी निर्माण झालेल्या असल्या आणि पुढे येणाऱ्या संतांच्या जीवनात देखील अशा चमत्कारांच्या कथा जनमानसाला आकर्षित करीत असल्या तरी या चमत्कारांना बाजूला ठेवत वेद उपनिषदापासून संत साहित्य पर्यंत सर्वत्र असणाऱ्या तत्त्व चिंतनाचीच कास आपण धरायला हवी. त्यातच आपले शाश्वत कल्याण आहे." असे विचार यवतमाळ येथील सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. सत्पाल सोवळे यांनी व्यक्त केले. 
           विदर्भ साहित्य संघ शाखा वणी द्वारा वणीचे भूषणीभूत सुपुत्र पद्मविभूषण माधव श्रीहरी उपाख्य बापूजी आणि यांच्या १४५ व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानामध्ये भारतीय साहित्यधारा वेदोपनिषद ते संत साहित्य या विषयावर ते व्यक्त होत होते. 
         याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे अध्यक्ष डॉ दिलीप अलोणे यांच्यासह विशेष अतिथी म्हणून दैनिक तरुण भारताचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी अनिरुद्ध पांडे उपस्थित होते. 
            कार्यक्रमाच्या आरंभी विजय गंधेवार यांनी सादर केलेल्या शारदास्तवनानंतर प्रास्ताविकात विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी बापूजींच्या योगदानाचे वैभव अधोरेखित केले. 
           राष्ट्रीय पातळीवर हिंदी भाषा प्रचारासाठी निवडण्यात आलेल्या समितीमध्ये अशासकीय प्रतिनिधी म्हणून अनिरुद्ध पांडे यांची निवड झाल्याबद्दल विदर्भ साहित्य संघ आणि नगर वाचनालयाच्या द्वारे त्यांचा सन्मान करण्यात आला.
           आपल्या अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद विवेचनामध्ये डॉ. सत्पाल सोवळे यांनी वेद, उपनिषद, पुराण, रामायण, महाभारत यांच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकत त्या आधारावर प्रकट झालेल्या संत साहित्यामध्ये भारतीय विचारांची आणि प्रामुख्याने तत्व चिंतनाची साहित्य धारा कशी प्रवाहित झाली आहे हे विविध उदाहरणांच्या द्वारे उलगडून दाखविले. 
         अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. दिलीप अलोणे यांनी व त्यांच्या प्रयासाची मुक्तकंठ प्रशंसा करीत या विषयाकडे पाहण्याची नवीन दृष्टी उपस्थित यांना प्राप्त झाली असेल असे म्हणत आपल्या शोधासाठी हे चिंतन अनिवार्य असल्याचे नमूद केले. 
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे उपाध्यक्ष गजानन कासावार यांनी तर आभार प्रदर्शन सचिव डॉ. अभिजित अणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे आणि राम मेंगावर यांनी विशेष परिश्रम घेतले. 
         कार्यक्रमाच्या पूर्वी अतिथी आणि वणीतील विविध गणमान्य व्यक्तींच्या हस्ते जटाशंकर मंदिरासमोर असणाऱ्या अणे चौकातील बापूजी अणे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post