वणी:–
येथील संस्कार भारती समिती वणी व सागर झेप बहुउद्देशीय संस्थे तर्फे गणेशपूर येथील विनायक मंगल कार्यालयात नटराज पूजन व गुरु पूजनाचा सोहळा दि.13 जुलैला करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाट्य कलावंत अशोक सोनटक्के, प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. करमसिंग राजपूत, सामाजिक कार्यकर्ते माधव सरपटवार, प्रा. दिलीप अलोणे, संस्कार भारती समिती वणी शाखेच्या अध्यक्षा रजनी पोयाम व्यासपीठावर उपस्थित होते.
नटराज पूजनानंतर प्रस्ताविक संस्कार भारती स्थानिक शाखेचे कार्यवाह सागर मुने यांनी केले. त्यानंतर गुरू पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात गजानन कासावार, मंगेश चटारे, माधव सरपटवार, प्रियंका कोटनाके यांचे गुरुपूजन करण्यात आले. त्यानंतर समिती तर्फे नाट्य कलावंत राम झिले, दिलीप अलोणे व बालनाट्य कलावंत वसुंधरा नघाटे, तेजेश्वर खुसपुरे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख वक्ते राजपूत यांनी प्रखर शब्दात गुरु कसे असावे,
गुरु कसे नसावे याचे विश्लेषण करून सांगितले. पूर्वीचे गुरु अंतरबाह्य निर्मळ होते. कोणतेही व्यसन करणारे नव्हते. प्रचंड ज्ञानी होते, आचरण शुद्ध होते. लबाडी करत नव्हते, सर्व शिष्यप्रति समान दृष्टी होती. त्यामुळेच विद्यार्थी गुरूंचा आदर, मान - सन्मान करत होते. समाजामध्ये त्यांचे आदराचे स्थान होते. आणि म्हणून अशा गुरूंचे पूजन लोकं करत होते. अशा अनेक सद्गुरूंची उदाहरणे देऊन समजावून सांगितले. जो बोलें तैसा चाले, त्याची वंदावे पाऊले, त्यासी गुरु म्हणावे, जो बोलें तैसा न चाले त्याची ओढावी पाऊले असे प्रभावी विचार मांडले. अशा कार्यक्रमाच्या आयोजनामुळे नवीन पिढीला गुरुचे महत्व कळेल, त्यांना संस्कार मिळेल. यातून काहीतरी नक्कीच परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रतिक्रिया उपस्थित अतिथींनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरीनाथ सोनटक्के तर ध्येय गीत व आभार प्रविण सातपुते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू खुसपुरे, अर्पित मोहुर्ले, संध्या अवताडे सुरेखा वडिचार, जयश्री सोनटक्के, प्रिया कोणप्रतिवार, सुमित्रा गोडे, प्रियंका कोटनाके, निशा उपरे, रजनी गारघाटे, सुनंदा गुहे यांनी परिश्रम घेतले.