वणी /
सकाळी सकाळी वणी - नागपूर ट्रॅव्हल्सचा लोकमान्य टिळक महाविद्यालय जवळ अपघात झाला. भरधाव ट्रॅव्हल्सने एका दुचाकीचालकाला धडक दिली.
या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला असून खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. तर ट्रॅव्हल्समधले प्रवासी किरकोळ जखमी झालेत. बुधवारी दिनांक 16 जुलै रोजी सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
प्राथमिक माहिती नुसार, सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास धनश्री ट्रॅव्हल्स (MH-40 AT- 0565) ही वणीहून नागपूरसाठी निघाली होती. सकाळचा वेळ असल्याने ट्रॅव्हल्स भरलेली होती. ट्रॅव्हल्स सुरु होऊन अवघ्या अर्ध्या किलोमीटरचेही अंतर कापले नव्हते. तेव्हा ट्रॅव्हल्सने जुन्या कॉटन मार्केट जवळील राकेश खुराणा यांच्या निवासस्थान समोर एका TVS मोपेड क्रमांक (MH-29 CA-7437) च्या चालकाला धडक दिली. त्यानंतर ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटले व बस डिव्हायडरवर चढली.
या अपघातात दुचाकी चालक कवडू गेडाम हे जखमी झाले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी मोपेड चालकाला रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. तर ट्रॅव्हल्समधले प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे. जखमी दुचाकी चालक कवडू गेडाम हा मोटर मेकॅनिक असल्याची प्राथमिक माहिती आहे.