उकणी येथील उर्वरीत जमिनीचे त्वरित संपादन करा

वणी / 

उकणी येथील उर्वरीत 10 टक्के जमिनीचे त्वरीत संपादन करून संपूर्ण पूनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी विकास मिना यांनी वेकोलि अधिका-यांना केली. बुधवारी दिनांक 18 जून रोजी भालर येथील वेकोलि रेस्ट हाऊस येथे जिल्हाधिकारी यांची बैठक झाली. बैठकीत कोलारपिंपरी कोळसा खाण प्रकल्प, वेकोली-वणी क्षेत्र, वणी नॉर्थ प्रकल्प आदींसह विविध खाणींसंदर्भातील प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीला खा. प्रतिभा धानोरकर व वेकोलि अधिका-यांची प्रमुख उपस्थिती होती. 

उकनी या क्षेत्रातील 85 ते 90 टक्के जमीन वेकोलीने संपादित केली. परंतु उर्वरीत 600 एकर जमिनीचे अद्यापही संपादन झालेले नाही. या भूमीवर सुमारे 175 शेतकरी उदरनिर्वाह करतात. ही जमीन वेकोलीने संपादित न केल्याने या शेतकऱ्यांना ही जमीन सोडावी लागेल. जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत वेकोलि सुरक्षा समितीचे सदस्य संजय खाडे यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले. 

त्यावर जिल्हाधिकारी यांनी उकणी गावातील उर्वरित जमिनीचे त्वरित संपादन करून संपूर्ण पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना वेकोलि अधिका-यांना दिल्या. बैठकीत खा. प्रतिभा धानोरकर यांनी वेकोलिसंबंधीत विविध प्रश्न आक्रमकपणे मांडले. वणी नॉर्थ कोलारपिंपरी ओपन कास्ट प्रकल्पासाठी अधिग्रहित जमिनींचा अद्याप मोबदला मिळालेला नाही. यावर या प्रकरणाची तातडीने चौकशी करून लवकरात लवकर मोबदला वितरित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. 

या बैठकीला उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, तहसीलदार निखिल धुळधर, वेकोली वणीचे क्षेत्रीय महाप्रबंधक सुजित पिसारोडी, वणी नॉर्थचे क्षेत्रीय महाप्रबंधक एम. संजीवा रेड्डी यांच्यांसह उकणी येथील सुरेश ढपकस, अमोल पुरडकर, पराग तुराणकर, सचिन जुनारकर, सचिन लोडे, किसन पारशिवे, केशव ताजणे, माधवराव लेडांगे, मनोहर सातघरे, योगेश ताजने, दीपक खाडे, रविंद्र जोगी, उषा ठाकरे, गीता पिंगे, संतोष पिंगे, राजू ठाकरे, सतीश खाडे, प्रमोद वासेकर, राजू अंकतवार, तेजराज बोडे, प्रफुल्ल उपरे, जितेंद्र बोंडे यांच्यासह कोलारपिंपरी, ब्राम्हणी, अहेरी येथील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post