वणी / दिपक छाजेड
जलसेवा सारखी दुसरी कोणतीही सेवा नाही. उन्हाळ्यात तहानलेल्या रेल्वे प्रवाश्यांना त्यांच्या डब्ब्याजवळ जाऊन थंड व शुद्ध पिण्याचे पाणी पाजण्याचे महावीर सेवाभावी संस्थेचे हे उपक्रम खरोखर स्तुतनीय आहे. खरं तर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याचे कर्तव्य रेल्वे विभागाचे आहे. परंतु वणी येथील महावीर सेवाभावी संस्था ही कर्तव्य पार पाडत आहे. असे विचार महावीर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे उन्हाळ्यात वणी रेल्वे स्थानकावर सतत दुसऱ्या वर्षी निःशुल्क जलसेवा उपक्रमाची शनिवार 14 जून रोजी सांगता करण्यात आली. या प्रसंगी महावीर भवन येथे आयोजित समारोप व सत्कार प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले.
यावेळी मंचावर उपस्थित आमदार संजय देरकर यांनी सुद्धा जलसेवा उपक्रम चालविण्याबद्दल महावीर सेवाभावी संस्थेचे कौतुक केले. रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची स्थायिक व्यवस्थेवर भर देत त्यांनी जलसेवा उपक्रमासाठी आमदार निधीतून आवश्यक ती मदत देण्याचे वचन दिले. तर माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी रेल्वे स्थानकावर जल सेवा उपक्रमात हिरीरीने सेवा देणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे कौतुक केले.
निःशुल्क जलसेवा उपक्रम समारोप व सत्कार प्रसंगी रेल्वे स्थानकावर जलसेवा देणाऱ्या स्वयं सेवकांचे मान्यवरांचे हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मंचावर खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, पणन महासंघाचे संचालक संजय खाडे, महावीर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अशोक भंडारी, वणी रेल्वे स्थानक प्रबंधक प्रेमकुमार रंजन हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभ होण्यापूर्वी अहमदाबाद येथे विमान अपघातात मृत नागरिकांच्या आत्मांच्या शांतीसाठी दोन मिनिट मौन ठेवण्यात आले. त्यानंतर णमोकार मंत्र गायन व मान्यवरांचे स्वागत करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. समारोप व सत्कार कार्यक्रमाचे संचालन आनंद झामड यांनी केले. प्रस्ताविक अध्यक्ष अशोक भंडारी यांनी मांडले तर आभारप्रदर्शन दीपक छाजेड यांनी केले.