निसर्गाचा आस्वाद घ्यायला हवा - प्रा.महादेव खाडे

वणी /

            केवळ आपल्या म्हणजे माणसाच्याच नव्हे तर जगातील सर्व पशुपक्षांच्या अगदी कीटकांच्या आवश्यक गरजा पूर्ण करणारे महान संसाधन म्हणजे हा निसर्ग जणू काही एक अब्जावधी कोनाड्याचे घर आहे. प्रत्येक कोनाडा हा आपला अधिकार असला तरी इतरांच्या कोनाड्याचे संरक्षण करीतच आपण आपले कर्तव्य करायला हवे. निसर्ग कर्म केल्याशिवाय काहीही देत नाही. ते करताना त्याचा आस्वाद घेण्याची भूमिका असावी ओरबाडण्याची नाही. " असा विचार प्रा. महादेव खाडे यांनी व्यक्त केले.
         विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि नगरवाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम माझे गाव माझा वक्ता च्या ४१ व्या पुष्पात ते पर्यावरण अब्जावधी कोनाड्याचे घर या विषयावर व्यक्त होत होते. 
         याप्रसंगी व्यासपीठावर विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे सहसचिव राजेश महाकुलकार अध्यक्षस्थानी उपस्थित होते. 
         विदर्भ साहित्य संघाचे शाखा सचिव डॉ.‌ अभिजित अणे यांनी प्रास्ताविक आणि परिचय करून दिल्यानंतर विजय गंधेवार यांनी वैयक्तिक गीत सादर केले.
             आपल्या अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवण व्याख्यानाच्या दरम्याने सृष्टीतील सर्व घटकांची परस्पर पूरकता आणि परस्परावलंबित्व विशद करून प्रा. महादेव खाडे यांनी आपले निसर्गाप्रती वर्तन कसे असायला हवे यावर भर दिला. विविध वैज्ञानिक संदर्भांचा दाखला देत निसर्गातील विविध घटकांमध्ये कसा सहसंबंध आहे ते सांगत केवळ माणूसच आपल्या स्वार्थासाठी निसर्गाची ही रचना कशी उध्वस्त करीत आहे या भीषण वास्तवाची खंत बोलून दाखवली.
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे सचिव डॉ अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन गजानन भगत यांनी केले.
          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राम मेंगावार, प्रमोद लोणारे आणि देवेंद्र भाजीपाले यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post