वणी :
वणी विधानसभा मतदारसंघातील २०२४ ची ही निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि निर्णायक वातावरणात होत आहेत. एकीकडे महाविकास आघाडीत उभी फूट पडली आहे तर दुसरीकडे मविआचे उमेदवार संजय देरकर यांना विविध राजकीय पक्षाचा पाठिंबा मिळत आहे.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आणि वणी विधानसभा प्रमुख अजय धोबे यांनी सोमवारी दुपारी दोन वाजता पत्रकार परिषदेतून मविआचे उमेदवार संजय देरकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
वणी विधानसभा मतदारसंघातील २०२४ ची निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि निर्णायक होत आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून आपण आपला लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठविणार आहोत. जो तुमच्या आमच्या आशा आकांक्षाचा प्रतिनिधी असणार आहे. सोबतच तुमचे आमचे अत्यंत मूलभूत आणि जिव्हाळ्याचे प्रश्न शासन स्तरावर सोडवणे अपेक्षित आहे.
संभाजी ब्रिगेड एक नोंदणीकृत राजकीय पक्ष असून यावर्षी संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडने इंडिया आघाडीचे बाजूने सक्रीय सहभाग घेतला होता. याचे कारण संभाजी ब्रिगेडची महाराष्ट्र स्तरावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने सोबत युती होती. त्यामुळे संभाजी ब्रिगेड इंडिया आघाडीचा एक भाग होता. हा आघाडी धर्म पाळुन देशामध्ये धर्माध विचाराचे आणि अराजकतेकडे नेणारे सरकार नको म्हणून निवडणुकीत संभाजी ब्रिगेड सर्वशक्तीनिशी लढली होती. त्याचाच परिणाम म्हणून देशभरात विशेषतः महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीला अभुतपूर्व यश मिळाले. परंतु काही कारणास्तव उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने सोबत ची युती संपुष्टात आली आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील स्थानिक राजकीय समीकरणाचा विचार करून व राज्यातील सध्याचे शेतकरी विरोधी, जाहिरात बाज, सरकारी तिजोरी खाली करणारे सरकार सत्तेवर यायला नको, भाजपा पुरस्कृत शिंदे आणि अजित पवार यांचे सरकार हे बेकायदेशीर सरकार आहे.
त्यामुळे संभाजी ब्रिगेड वणी विधानसभेकरिता आपला नामांकन अर्ज मागे घेऊन संजय देरकर यांना जाहीर पाठिंबा देत आहे.
असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आणि वणी विधानसभा प्रमुख अजय धोबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सोमवारी ४ नोव्हेंबर ला पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर, संभाजी ब्रिगेड चे ऍड अमोल टोंगे यांच्यासह शिवसेना (उबाठा) व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.