लोकमान्य टिळक महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन.

वणी:

           वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी , ती जोपासली जावी आणि यासाठी आवश्यक दर्जेदार साहित्य त्यांना उपलब्ध व्हावे या दृष्टीने लोकमान्य टिळक महाविद्यालय वणीच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने बुधवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ बुधवार रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत महाविद्यालयाच्या लोकमान्य सभागृहात भव्य ग्रंथ प्रदर्शनीचे आणि विक्री सुविधेचे आयोजन करण्यात आले आहे. 
           शिक्षण प्रसारक मंडळ वणीचे अध्यक्ष विजय मुकेवार यांच्या शुभहस्ते या प्रदर्शनीचे उद्घाटन होणार असून यामध्ये नागपूर येथील साई ज्योती प्रकाशन, पिंपळापुरे प्रकाशन, साईनाथ प्रकाशन , श्री साई ग्रंथ वितरक तथा एस .चांद प्रकाशक आणि वितरक ही प्रतिष्ठाने सहभागी होणार आहेत.
           यामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशी संबंधित पुस्तके, संबंधित संदर्भ ग्रंथ, स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी पुस्तके यांच्यासह इंग्रजी, मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषेतील कथा, कादंबरी, कवितासंग्रह, प्रवास वर्णन इत्यादी विविध प्रकारचे साहित्य ठराविक सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे. 
            केवळ महाविद्यालयीन किंवा विद्यालय विद्यार्थीच नव्हे तर सर्वच वाचन प्रेमी जनतेसाठी हे प्रदर्शन मुक्त असून वणीतील अधिकाधिक साहित्य प्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे आणि ग्रंथपाल डॉ. गुलशन कुथे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post