२० ते २५ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी कुटुंबांना जागेचे पट्टे द्या!, रासा येथील आदिवासी नागरिकांचे *विजय चोरडिया* यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन

वणी :

तालुक्यातील रासा येथील ई-वर्ग जागेवर मागील २० ते २५ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी कुटुंबांना त्यांच्या ताब्यातील जागेचे अधिकृत पट्टे देण्यात यावेत, अशी मागणी समस्त आदिवासी समाज वस्तीतील नागरिकांनी शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात तहसीलदार, वणी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनानुसार, रासा येथील अनेक आदिवासी नागरिक मागील दोन ते अडीच दशकांपासून संबंधित जागेवर घरे बांधून कुटुंबासह वास्तव्यास आहेत. याच ठिकाणी त्यांचा संसार उभा राहिला असून, त्यांचे दैनंदिन जीवनही याच जागेशी जोडले गेले आहे. मात्र, आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने अनेक कुटुंबांकडे स्वतःच्या मालकीची पर्यायी जागा उपलब्ध नाही. अनेक वर्षांपासून वास्तव्य करूनही त्यांना अद्याप जागेच्या मालकी हक्काचे पट्टे मिळालेले नाहीत.
यामुळे भविष्यात आपल्या निवासाबाबत असुरक्षितता निर्माण झाली असून, अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन संबंधित वस्तीची प्रत्यक्ष पाहणी करावी, आवश्यक चौकशी करावी आणि शासनाच्या प्रचलित नियमांनुसार पात्र आदिवासी कुटुंबांना त्यांच्या ताब्यातील जागेचे अधिकृत पट्टे देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच अनेक वर्षांपासून एकाच जागेवर वास्तव्यास असलेल्या गरीब व गरजू आदिवासी कुटुंबांना न्याय मिळवून देत त्यांच्या निवासाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा. पात्र कुटुंबांना शासनाच्या घरकुल व इतर निवासी योजनांचा लाभ मिळावा, निवासस्थानाबाबत कायमस्वरूपी सुरक्षितता मिळावी आणि त्यांना हक्काचे घर सुरक्षित ठेवता यावे, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तीन पिढ्यांपासून वास्तव्य करणाऱ्या गरीब आदिवासी कुटुंबांच्या निवासाचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागामार्फत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post