वणी :
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने महिला शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वणी तालुक्यातील पात्र महिलांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन महिला शेतकरी व महिला बचत गटाच्या समन्वयक सौ. अरुणा वासेकर यांनी केले.
जमीन स्वतःच्या मालकीची नसली तरी प्रत्यक्ष शेती करणाऱ्या महिला शेतमजूर तसेच शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांनाही या प्रमाणपत्राचा लाभ मिळणार आहे. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, फळबाग, फुलशेती तसेच बचतगटाच्या माध्यमातून विविध शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
महिला शेतकरी प्रमाणपत्रामुळे महिलांना कृषी क्षेत्रातील अधिकृत शासकीय ओळख मिळण्यास मदत होणार असून पीक कर्ज, कृषी कर्ज, पीक विमा, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, विविध शासकीय योजना आणि कृषी विभागाच्या प्रशिक्षणात सहभाग घेण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.
या योजनेसाठी १८ वर्षांवरील प्रत्यक्ष शेती करणाऱ्या महिला, शेतमजूर महिला तसेच शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिला पात्र राहणार आहेत. पात्रतेची पडताळणी ग्रामसभा, ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतीमार्फत करण्यात येणार असून पात्र अर्जदारांना ७ दिवसांत प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
नोंदणीसाठी आधार कार्ड आणि आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. कृषी विभागाच्या अधिकृत वेब पोर्टलवरून तसेच गावागावात आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष शिबिरांमध्ये महिलांना नोंदणी करता येणार आहे.
कृषी क्षेत्रात महिलांचा मोठा सहभाग असूनही अनेक महिलांकडे अधिकृत शेतकरी ओळख उपलब्ध नाही. त्यामुळे पात्र महिलांनी पुढाकार घेऊन महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणी करावी आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सौ. अरुणा वासेकर यांनी केले.