स्टिंग ऑपरेशन न्यूज | परशुराम पोटे
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी रविवार, ११ ऑक्टोबर रोजी उत्स्फूर्त मतदान झाले. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चुरशीची लढत झाल्याने आज, सोमवार १२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बँकेच्या संचालक मंडळात एकूण २५ जागा असून, त्यापैकी दोन संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित २३ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. दिग्रस तालुका गटातून संजय देशमुख, तर पुसद तालुका गटातून विजय जाधव विजयी झाल्याने उर्वरित १४ तालुका गटांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. जिल्हा गटातील चार जागांचाही या निवडणुकीत समावेश आहे.
या निवडणुकीत एकूण ५८ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. जिल्ह्यातील १६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हा गटात एकूण ९७९ मतदार आहेत. आज सकाळी ९ वाजता समर्थ प्राईड मंगल कार्यालयात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
वणी तालुका गटाच्या निकालाकडे लक्ष
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वणी तालुका गटातील लढतीचीही उत्सुकता आहे. या गटात कोंगरे, मत्ते आणि कातकडे यांच्यात तिरंगी सामना असल्याने मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे लक्ष लागले आहे.