वणी :
शिवसेना वणीच्या वतीने वणी शहरातील बालगोपालांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘भव्य तान्हा पोळा उत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता शासकीय मैदान, पाण्याची टाकी, वणी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या तान्हा पोळा उत्सवात बालगोपालांसाठी विविध वयोगटांनुसार स्पर्धा घेण्यात येणार असून, सहभागी स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. एकूण २० सायकली बक्षिसांचा वर्षाव करण्यात येणार असल्याने बालगोपालांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्पर्धेतील गट ‘अ’ (वय ० ते ४ वर्षे) यामध्ये प्रथम क्रमांकासाठी इलेक्ट्रिक त्रिचक्री, तसेच तीन त्रिचक्री आणि एक स्कूटर अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. गट ‘ब’ (वय ४ ते ६ वर्षे), गट ‘क’ (वय ६ ते ९ वर्षे) आणि गट ‘ड’ (वय ९ ते १२ वर्षे) यामध्ये प्रत्येकी आकर्षक सायकली बक्षिसे देण्यात येणार आहेत.
उत्सवात सर्व सहभागी स्पर्धकांसाठी प्रोत्साहनपर बक्षिसे देखील ठेवण्यात आली आहेत. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, एकूण ३०० नोंदणीची मर्यादा असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.