हृदयविकाराच्या धक्क्याने अंगणवाडी सेविकेची प्राणज्योत मालवली, मानकी गावावर शोककळा; मनमिळावू स्वभावाच्या बेबिताई मालेकर काळाच्या पडद्याआड

वणी / प्रतिनिधी

वणी तालुक्यातील मौजे मानकी येथील रहिवासी सौ. बेबिताई दादाजी मालेकर (वय ५७) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. ही घटना मंगळवार, दि. २६ मे रोजी रात्री सुमारे ११ वाजताच्या दरम्यान घडली. त्यांच्या निधनामुळे मानकी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सौ. बेबिताई मालेकर या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. अत्यंत मनमिळावू, प्रेमळ आणि सेवाभावी स्वभावामुळे त्या परिसरात परिचित होत्या. मंगळवारी रात्री अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने वणी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्या संगणक ऑपरेटर प्रदिप मालेकर यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर बुधवार, दि. २७ मे रोजी सकाळी ११ वाजता मानकी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

(स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!)

Post a Comment

Previous Post Next Post