भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर माकपचा एल्गार; वणी, मारेगाव, यवतमाळात आंदोलन‘३९ आमदारांची नावे जाहीर करा’; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

वणी | स्टिंग ऑपरेशन न्यूज :

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने राज्यभर एल्गार पुकारत वणी, मारेगाव व यवतमाळ येथे आंदोलन करत प्रशासनाला निवेदने सादर केली. दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या या आंदोलनात जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
राज्यातील तब्बल ३९ आमदार अशोक खरात यांच्या तंत्र-मंत्र व भोंदूगिरीच्या जाळ्यात अडकले असल्याचे गंभीर आरोप होत असून, या आमदारांची यादी तातडीने जाहीर करून त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच त्यांच्या राजीनाम्यांची मागणी करण्यात आली आहे.
माकपच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, लोकप्रतिनिधींवर संविधानाने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याची जबाबदारी दिली असताना, अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणे ही गंभीर बाब आहे. यामुळे समाजात तंत्र-मंत्र, जादूटोणा यांसारख्या अंधश्रद्धांना राजमान्यता मिळत असून सामान्य नागरिकही अशा भोंदू बाबांच्या जाळ्यात अडकत आहेत.
तसेच, अशोक खरात प्रकरणात शोषणाला बळी पडलेल्या महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसत आहे. हे व्हिडिओ तातडीने हटविण्याची कारवाई शासनाने करावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष सुरू करणे, जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे तसेच सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या बाबा-बुवा, ज्योतिष व तंत्र-मंत्राच्या जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याची मागणी करण्यात आली.
यवतमाळ येथे कॉ. ॲड. कुमार मोहरमपूरी, कॉ. ॲड. डी. बी. नाईक, कॉ. चंद्रशेखर सिडाम, कॉ. देविदास मोहकर, कॉ. मनीष इसाळकर, कॉ. अनिता खुनकर, कॉ. ऊषा मुरखे, कॉ. रमेश मिरासे, कॉ. संदीप सुरपाम आदी उपस्थित होते.
वणी येथे गजानन ताकसांडे, बादल कोडापे, कवडू चांदेकर, संजय वालकोंडे, शंकर गाऊत्रे, अमोल चटप, संभा टांगे, अशोक गेडाम, भीमराव आत्राम यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
तर मारेगाव येथे रामभाऊ जिद्दीवार, श्रीकांत तांबेकर, बंडू मत्कुलवार, सुदर्शन टेकाम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post