“खोगीर भरतीमुळे शाळेचा दर्जा धोक्यात?”,“अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या समायोजनावरून वणीत खळबळ”

वणी :

वणी शहरातील एका नामांकित मराठी माध्यम शाळेबाबत सध्या ‘खोगीर भरती’चा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. जिल्हा परिषद यवतमाळ येथील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी तालुक्यातील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत आदेश काढल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. या आदेशानुसार संबंधित कर्मचारी शाळेत रुजू होण्यासाठी वारंवार चकरा मारत असल्याचे समजते.
या प्रकरणाची अधिक चौकशी केली असता, तालुक्यातील काही शाळांमध्ये आर्थिक व्यवहारातून अपात्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे बोलले जात आहे. आता हेच कर्मचारी ‘अतिरिक्त’ ठरवून त्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे.
दरम्यान, इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावातही संबंधित मराठी शाळेने आपला शैक्षणिक दर्जा, शिस्त आणि उत्कृष्ट निकाल कायम ठेवत विद्यार्थ्यांची संख्या टिकवून ठेवली आहे. त्यामुळे या शाळेला शहरात विशेष नावलौकिक मिळाला असून पालकांमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा असते.
अशा प्रतिष्ठित शाळेत ‘खोगीर’ कर्मचाऱ्यांची भरती झाल्यास शाळेचा दर्जा आणि प्रतिमा ढासळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शाळेचे संचालक मंडळ कोणता निर्णय घेते, याकडे आता वणीकरांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post