सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपण्याची गरज - राजू निमसटकर

स्टिंग ऑपरेशन न्यूज/

 वंचित बहुजन आघाडी, तालुका मारेगावच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र सूर्यपुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांचा ११२ वा जयंती उत्सव मारेगाव येथे मोठ्या उत्साहात, सामाजिक ऐक्य आणि विचारमंथनाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. स्थानिक “धम्मराजिका” बुद्ध विहारात पार पडलेल्या या कार्यक्रमास कार्यकर्ते व समाजबांधवांची मोठी उपस्थिती लाभली होती.  

जयंती उत्सव सोहळ्याची सुरुवात बुद्ध वंदनेने करण्यात आली. यावेळी बोधाचार्य अमरनाथ तेलतुंबडे, बोधाचार्य गौतम मालखेडे यांचेसह वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू निमसटकर, तात्याजी पाटील चिकाटे, अनिल खैरे, रवी तेलंग आणि अनंता खाडे यांचेसह समस्त उपस्थितांनी भैय्यासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. 

वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या सूर्यपुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सव सोहळ्यात, भैय्यासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रमुख वक्ते राजू निमसटकर यांनी बौद्ध समाजाची वर्तमान स्थिती, शिक्षणाची आवश्यकता, आणि भविष्यातील धोके यावर मुद्देसूद भाष्य केले. अन्यायाविरुद्धची चीड ही भैय्यासाहेबांची खरी शिकवण असून सामाजिक परिवर्तनासाठी ती अनिवार्य आहे. त्यासाठी शिक्षणाबरोबरच संघटित होणे हे समाजाच्या उन्नतीचे मूलभूत आधार असून बाबासाहेब आणि भैय्यासाहेब यांच्या विचारांचा वसा आणी वारसा जाणत्या तरुण कार्यकर्त्यांनी पुढे नेणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. 

राजू निमसटकर पुढे बोलताना म्हणाले, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर उद्भवलेल्या खडतर परिस्थितीत सुर्यपूत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकरांनी खंबीरपणे चळवळीचे नेतृत्व केले. एकाचवेळी ते विरोधक आणि स्वकियांशी लढत होते. परिणाम स्वरूप सूर्यपुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने बौद्ध समाजात जागृती, शिक्षणाची ओढ आणि हक्कांसाठीच्या संघर्षाची धग निर्माण झाली. म्हणूनचं भैय्यासाहेब आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा मजबूत पाया निर्माण करण्यासाठी बौद्ध समाजाने संघटित राहणे अत्यंत महत्त्व आहे. अशी ठाम भूमिकाही त्यांनी यावेळी बोलून दाखविली. 

यावेळी भैय्यासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यावर बोलताना बोधाचार्य अमरनाथ तेलतुंबळे म्हणाले, 
भारतीय बौद्ध महासभेचे कार्य पुढे नेणे असो, ऐतिहासिक चैत्यभूमीचे निर्माण असो वा बाबासाहेबांचे साहित्य प्रकाशन असो इत्यादी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि जबाबदारीचे कार्य सूर्यपुत्र भैय्यासाहेबांनी अनेक प्रकारचे दुःख पचवून, त्याग करून पूर्ण केले. म्हणूनचं आंबेडकरी चळवळ या सूर्यपूत्राची नेहमीच ऋणी राहील, असे स्पष्ट मत तेलतुंबळे यांनी व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे संचालन बोधाचार्य गौतम मालखेडे यांनी केले तर बोधाचार्य अमरनाथ तेलतुंबडे यांनी धम्मपठण करून भैय्यासाहेबांचा जीवनपट अधोरेखित केला.
आयोजित जयंती उत्सव सोहळ्यास वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू निमसटकर, बोधाचार्य अमरनाथ तेलतुंबडे, बोधाचार्य गौतम मालखेडे, वंचित बहुजन आघाडीचे मारेगांव तालुका कार्याध्यक्ष अनिल खैरे, मारेगाव शहराध्यक्ष अनंता खाडे, कार्याध्यक्ष रवी तेलंग, महासचिव विनेश मेश्राम, तात्याजी पाटील चिकाटे, बाळू गजभिये, समता सैनिक दलाचे वसुमित्र वनकर, महिला शहराध्यक्षा रेखा काटकर, महासचिव शितलताई तेलंग, मीराताई दुपारे, जयश्री दारुंडे, शामला खैरे, सारिका गवई, दीपा तेलंग, धोपटे काकू, विजय खाडे, प्रानशील पाटील, लक्ष्मीकांत तेलंग, धनराज मुन, पुंडलिक साठे, तारानाथजी तामगाडगे, बाळू टेनपे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post