वणी :
वणी नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचाराला रविवारी शिवसेना शिंदे गटाने काढलेल्या शक्ती प्रदर्शन भव्य रॅलीने शहराचे रस्ते गजबजून गेले. रविवार ची रॅली ही वणीच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि विक्रमी ठरल्याचा दावा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या रॅलीत लाडक्या बहिणीची उपस्थिती मात्र लक्षणीय होती. सदरची रॅली हि शिवसेना (शिंदे) गटाचे जिल्हा संघटक विजय चोरडिया, शिवसेना नेते विनोद मोहितकर आणि युवा नेते ऍड. कुणाल चोरडिया यांच्या नेतृत्वात काढण्यात आली.
रविवारी सकाळपासूनच ढोल-ताशांच्या गजरात, भगवा झेंडा डोलवत, आणि पायदळ कार्यकत्यांच्या गदीर्ने संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अध्यक्ष पदाच्या उमेदवार कुमारी पायल तोडसाम यांच्यासह सर्व १४ प्रभागातील २९ उमेदवारांना नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून शिंदे शिवसेना गटाचा आत्मविश्वास अधिकच दृढ झाला आहे.
रविवारी ३० नोव्हेंबर ला पाण्याची टाकी जवळील शासकीय मैदानावर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक विजय चोरडिया, शिवसेना नेते विनोद मोहितकर, युवा नेते ऍड कुणाल चोरडिया यांच्या नेतृत्वात रॅली ला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, खाती चौक, गांधी चौक, गाडगे बाबा चौक, शहीद भगतसिंग चौक, दिपक चौपाटी, श्री रंगनाथ स्वामी चौक, सर्योदय चौक, टागौर चौक, बाबासाहेब आंबेडकर चौक, टिळक चौक येथून शासकीय मैदानावर शिवसेना (शिंदे) गटाच्या रॅली चा समारोप झाला. यावेळी अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत फटाक्यांच्या आतीषबाजीने आणि पुष्पवृष्टीने केले. लाडक्या बहिणी आणि तरुणांचा लक्षणीय सहभाग खास करून दिसत होता. स्थानिक राजकीय जाणकारांच्या मते, रविवारच्या रॅलीत दिसलेली लोकांची प्रचंड उपस्थिती विरोधकांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. मतदारांची पसंती कोणाकडे आहे हे या रॅलीच्या गर्दीतून स्पष्ट दिसत असल्याची चर्चा वणीभर रंगली होती.