बळीराजा; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कॉंग्रेस सरसावली, संजय खाडे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे प्रशासनालाा निवेदन

वणी :

यावर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे सोयाबीन ने दगा दिला तर सततच्या पावसामुळे कापूस पीकही धोक्यात आले त्यामुळे बळीराजा, शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. आधीच संकटात असताना केंद्र शासनाच्या आधारभूत दरानुसार हंगाम २०२५-२६ मधील सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले सोयाबीन बाजारात अत्यल्प दराने विक्री करावे लागत असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदीसाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात यावी, तसेच केंद्र शासनाच्या आधारभूत दरानुसार खरेदी प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनास योग्य दर मिळू शकेल. या मागणीसाठी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वात तहसीलदार वणी यांच्या मार्फत सरव्यवस्थापक नाफेड मुंबई यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी संजय खाडे यांनी सांगितले की, “कापूस व सोयाबीन हे विदर्भातील शेतकऱ्यांचे मुख्य पिक आहे. मात्र शासनाच्या निर्णयातील विलंब आणि ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेतील अडचणींमुळे अनेक शेतकरी सीसीआय व नाफेडच्या खरेदी नोंदणीपासून वंचित राहत आहेत. शासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.” 
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट सुविधेचा अभाव असल्याने ऑनलाइन नोंदणी करताना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच मार्डी परिसरात खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना लांब अंतरावर जाऊन उत्पादन विकावे लागत असून, त्याचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
दरम्यान, नाफेडकडून सोयाबीन खरेदीची प्रक्रिया अद्याप सुरु नसल्याने बाजारात शेतकऱ्यांना अत्यल्प दर मिळत आहेत. त्यामुळे शासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहून तत्काळ नोंदणी सुरू करावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.
तसेच सीसीआय कापूस खरेदी नोंदणीसाठी तात्काळ मुदतवाढ द्यावी, मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी नोंदणी प्रक्रिया तातडीने सुरू करावी. अशा प्रमुख मागण्या आहेत.
 
निवेदन देतेवेळी पुरुषोत्तम आवारी, अशोक चिकटे, राजू अंकतवार, प्रफुल्ल उपरे, प्रमोद वासेकर, प्रमोद लोणारे, सुधीर खंडाळकर, कैलास पचारे, पलाश बोंडे, महादेव पडोळे, एस. पेंदोर, विप्लव तेलतुंबडे, प्रेमनाथ मंगाम, अनंता डंभारे, नरेंद्र चिकटे, दिनेश पाहुनकर, सुनील वरारकर, प्रशांत गोहोकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post