त्या मारहाण प्रकरणी दिरंगाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, पत्रकार परिषदेतून इशारा...

वणी :

 तालुक्यातील पठारपूर येथे क्षुल्लक कारणावरून युवकाला बेदम मारहाण करण्यात आली होती. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असताना देखील त्यावेळी ठाणेदाराने योग्य ती कारवाई केली नाही असा आरोप आदिवासी संघटनांनी केला असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेतून करण्यात आली असून कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

पठारपूर येथील वृषभ विजय गेडाम (वय १८) घराजवळ कुत्र्यांना पोळी चारत होता. त्यावेळी प्रशांत ठमके हा हातात काठी घेऊन कुत्र्याला मारण्यास आला असता त्याला वृषभने हटकले. यावेळी चांगलाच वाद झाला. प्रशांतने वृषभ याच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. त्याचवेळी सिंधू ठमके, चंपत ठमके व सोनू ठमके यांनी शिवीगाळ करून अंगावर मारण्यास धावून आले होते, असा आरोप आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने वृषभवर नागपूर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. वडील विजय गेडाम यांनी मुकुटबन पोलिस ठाणे गाठले व रितसर तक्रार करून हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी राजकीय दबावाला बळी पडून हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल न करता थातूर मातूर कारवाई केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. घटनेच्या १५ दिवसांनी वैद्यकीय अहवालावरून पोलिसांनी हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा नोंद केला. मात्र, तो पर्यंत आरोपींनी न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिन मिळवला. त्यामुळे अटक टळली. पोलिसांनी केलेल्या दिरंगाईमुळे आरोपींना पळून जाण्यास वेळ मिळाला. पोलिसांनी लगेच गुन्हा नोंद केला असता तर अटक करता आली असती. त्यामुळे याला जबाबदार असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आदिवासी संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला. या पत्रकार परिषदेला माजी आमदार विश्वास नांदेकर, गीत घोष, होमदेव किनाके, संजय आवारी, सुभाष आडे सर, सह आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

*पठारपूर येथील मारहाण प्रकरणात कोणतीही दिरंगाई पोलिसांनी केलेली नाही. घटनेच्या दिवशीच फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला. त्यानंतर वैद्यकीय अहवालावरून गुन्ह्यात वाढ सुद्धा करण्यात आली. आरोपींना अभय देण्याचा प्रश्नच नाही.*-

*दिलीप वडगावकर, ठाणेदार, मुकुटबन.*

Post a Comment

Previous Post Next Post