काशी नगरीत झळकत आहे महाराष्ट्राचा अभिमान., वेदमूर्ती देवव्रत रेखे यांच्याद्वारे शुक्ल यजुर्वेदाचे दुर्लभ दंडक्रम पारायण.

स्टिंग ऑपरेशन न्यूज/

"वेदोऽखिलो धर्ममूलम्" ! वेद हे अखिल धर्माचे मूळ आहेत. केवळ धर्माचेच नव्हे तर संपूर्ण जीवनाचे आधारस्तंभ आहेत. वेद विद्येचे जतन हा मानवी इतिहासातील एक अलौकिक असा ठेवा आहे. केवळ पाठांतराच्या आधारे हजारो वर्ष एक स्वर देखील न बदलता अखिल वेदविद्येचे संगोपन आणि प्रसारण करण्यासाठी हजारो ज्ञानवंतांनी आपली जीवन समर्पित केले आहे. याच श्रृंखलेत अवर्णनीय रोमांचकारी उपक्रम म्हणजे अविमुक्त क्षेत्र काशीमध्ये परमपूज्य श्री द्राविड शास्त्रींच्या साङ्वेद विद्यालयात सुरू असलेले शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिन शाखेचे दंडक्रम पारायण. 
           वेदमंत्रांच्या सुस्पष्ट आणि अपरिवर्तित जोपासनेसाठी ज्या विविध पद्धतींमध्ये त्यांचे पठण केल्या जाते त्याला अष्ट विकृती असे म्हणतात. यापैकी ही पद्धती अत्यंत कष्टसाध्य असून या स्वरूपातील शुक्लयुर्वेदाच्या दंडक्रम पारायणाचा हा योग तब्बल २०० वर्षानंतर साकार होत आहे यातच त्याचे अतुलनीयत्व लक्षात यावे. त्याहीपेक्षा अधिक विस्मयकारक गोष्ट म्हणजे हे परमदैवी कार्य साकार करणारे वेदमूर्ती पू. देवव्रत महेश रेखे गुरुजी हे श्री अहिल्या नगर स्थित केवळ १९ वर्षांचे नवयुवक आहेत हे विशेष उल्लेखनीय. 
          पद्मश्री सन्मान प्राप्त परमपूज्य श्री गणेश्वर शास्त्री द्राविड आणि त्यांचे जेष्ठ बंधू परमपूज्य विश्वेश्वर शास्त्री द्राविड यांच्या आशीर्वादाने साङ्गवेद विद्यालयात होत असलेल्या पारायणात अमरावती येथील वेदमूर्ती पू . देवेंद्र रामचंद्र गढीकर शास्त्री हे परीक्षणाचे महानदायित्व सांभाळत आहेत. 
          वैदिक सम्राट श्रीकृष्ण शास्त्री गोडसे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित हा उपक्रम वेदब्रह्मश्री विश्वनाथ शास्त्री जोशी गुरुजी आणि देवव्रत यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. मधुरा महेश रेखे यांना समर्पित आहे.
           अहिल्यानगर येथे पूज्य महेशजी रेखेजी गुरुजी व कै.मधुरा महेश रेखे यांनी स्थापन केलेल्या श्रुती स्मृती ज्ञानमंदिर वेदपाठशाळेच्या द्वादशाब्दी निमित्ताने हे पारायण आयोजित होत आहे.
          पारायण कर्ते,पारायण परीक्षक आणि पारायण आयोजक अशा सर्व महाराष्ट्रीयन लोकांच्या माध्यमातून विद्यानगरी काशीक्षेत्रात होत असलेला हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठीच अपूर्व गौरवाचा विषय आहे.
         समोर ग्रंथ ठेवून देखील आपल्याला नेमकेपणाने म्हणण्यात अडचण जाईल अशा संपूर्ण वेदाचे मुखोद्गत स्वरूपातील हे सादरीकरण श्रवण करणे हा खरोखरच कर्णपुटांना तृप्त करणारा लोकविलक्षण अनुभव आहे.
         श्रीक्षेत्र माहूर येथील पू. निलेश शास्त्री केदार गुरुजी यांच्या प्रमुख आयोजनात कृष्ण यजुर्वेद घनपाठी श्री चंद्रशेखर द्राविड, काशी येथील पाठक क्लासेस चे संचालक प्रदीपजी पाठक तथा आश्रमातील विद्यार्थी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अपरिमित परिश्रम घेत आहेत.
           भारतीय संस्कृती आणि वेदवाङ्मयावर प्रेम करणाऱ्या ३० नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या ५० दिवसीय उपक्रमाचा एकदा तरी अवश्य लाभ घ्यावा असे सविनय आवाहन.

Post a Comment

Previous Post Next Post