वणी /
रस्त्याच्या कडेला ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. वणी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वणी- कायर मार्गावर बुधवार दिनांक २५ जून रोजी दुपारी १:३० ते २ वाजता दरम्यान ही घटना घडली. दुचाकी चोरी गेल्याची तक्रार फिर्यादी सुनील सुभाष वाघडकर (३२), रा. गोकुळ नगर वणी यांनी पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. विशेष म्हणजे वणी परिसरात दुचाकी चोरट्यांनी धुडगूस घातला असून पोलिसांनी चोरट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
फिर्यादी तरुण हा शेती व्यवसाय करतो. तो नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी १० वाजता आपली दुचाकी क्रमांक MH-29 AV- 6362 घेऊन वाघदरा शेतशिवारात असलेल्या आपल्या शेतात जाण्यासाठी निघाला वणी - कायर मार्गावरील सेवनस्टार सागबन जवळ खामनकर यांच्या शेताजवळ रस्त्याच्या कडेला त्यांनी आपली दुचाकी उभी केली आणी आपल्या शेतात गेले. शेतातील कामे आटोपून दुपारी १:३० ते २ वाजता घराकडे जाण्यासाठी निघाले असता त्यांना आपली दुचाकी दिसून आली नाही.
आजुबाजूला शोध घेऊनही डिलक्स कंपनी ची दुचाकी मिळून न आल्याने शेवटी सुनील वाघडकर यांनी वणी पोलिस स्टेशन मध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला आहे.