वणी :
इंधन दरवाढीच्या धोरणाविरोधात तसेच घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती आणि कृत्रिम तुटवड्याच्या निषेधार्थ आज वणी येथे महिला काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सौ. संध्याताई सव्वालाखे व यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ. वंदनाताई आवारी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे आंदोलन पार पडले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करीत शासनाच्या धोरणांचा निषेध केला. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी, वणी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना पाठविण्यात आले.
यापूर्वी महिला काँग्रेसच्या वतीने येथील वसंत जिनिंग हॉलमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. संध्याताई सव्वालाखे यांनी सांगितले की, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक, गृहिणी, शेतकरी व कामगार वर्गाचे जीवन अत्यंत कठीण झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या सतत वाढणाऱ्या किमतीमुळे सामान्य जनतेसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच, एफस्टीन फाईल प्रकरणात ज्यांची नावे समोर आली आहेत, त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ. वंदनाताई आवारी यांनी सांगितले की, शासनाने तात्काळ गॅस व इंधन दरवाढ मागे घ्यावी, कृत्रिम तुटवडा थांबवावा आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा. अन्यथा काँग्रेसच्या वतीने जनतेच्या न्याय व हक्कांसाठी व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
चुलीवर स्वयंपाक करताना महिला काँग्रेसच्या पदाधिकारी
यावेळी सौ. साधना गौरकार, शारदा ठाकरे, संगीता खाडे, करुणा कांबळे, प्रमिला पावडे, अल्का मोहाडे, सविता गंधेवार, मंदा सोनरखन, प्रमिला गोहोकार, कलावती कौरासे, सविता रासेकर, माया गाडगे, वंदना चवले यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे, तालुका अध्यक्ष विकेश पानघाटे, वसंत जिनिंग अध्यक्ष प्रमोद वासेकर आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.