वणी / प्रतिनिधी :
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य आणि नेत्रदीपक शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
“छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य उभे करण्यासाठी कोणत्याही आमदार-खासदाराची गरज नसते; त्यासाठी केवळ रयतेची साथ आणि प्रखर इच्छाशक्ती आवश्यक असते. वणीची रयत आपल्या राजासाठी सदैव सज्ज आहे,” असे रोखठोक प्रतिपादन मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी केले.
वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित भव्य शिवजयंती सोहळ्यात ते बोलत होते. उंबरकर यांच्या संकल्पनेतून मागील काही वर्षांपासून वणी शहरात शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत असून यंदाही त्याच परंपरेला साजेसा दिमाखदार सोहळा पार पडला.
यावर्षीच्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराजांच्या विद्यमान पुतळ्याच्या पाठीमागे उभारण्यात आलेली १०० फूटांहून अधिक उंचीची भव्य किल्ल्याची प्रतिकृती होय. या देखाव्यामुळे आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने वातावरण दणाणून गेले होते. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. विशेषतः महिला आणि तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.
यावेळी बोलताना राजू उंबरकर म्हणाले की, हा सोहळा केवळ एक उत्सव नसून रयतेच्या अस्मितेचे प्रतीक आहे. पुढील काळात वणीतील शिवजयंती उत्सव यापेक्षाही अधिक भव्य स्वरूपात साजरा केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तसेच आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भविष्यात याहीपेक्षा अधिक भव्य आणि अश्वारूढ स्वरूपात उभारण्याची भावना व्यक्त केली. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रयत्नशील राहणार असून अश्वारूढ पुतळ्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.