वणी /
वणी पोलिसांनी एका फसवणूक प्रकरणात तत्परता दाखवत फिर्यादीला चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळवून दिला आहे. १६ मार्च, २०२५ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात, आरोपी कृष्णा कन्हैया येधानी (वय २७, रा. कवठा, नागपूर) आणि जितेंद्र जीवन राठोड (वय २९, रा. आसोला सावंगी, नागपूर) यांनी फिर्यादी विजय महादेव टोंगे (वय ४४, रा. अंतरगाव, चंद्रपूर) यांना गुप्तधन काढून देतो, असे सांगून १,५०,००० रुपये रोख आणि ९०,००० रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस (वजन ११.३४० ग्रॅम) असा एकूण २,४०,००० रुपयांचा ऐवज चोरला होता.
वणी पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करत दोन्ही आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून चोरी झालेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला.
आज, दिनांक ०९/०४/२०२५ रोजी वणी येथील मा. JMFC कोर्टाने मुद्देमाल फिर्यादीला परत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पोलीस निरीक्षक श्री. गोपाल उंबरकर यांच्या हस्ते फिर्यादी विजय टोंगे यांना पोलीस स्टेशनमध्ये मुद्देमाल परत करण्यात आला.
मुद्देमाल परत करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. निलेश अपसुंदे आणि पोलीस उपनिरीक्षक श्री. धीरज गुल्हाने उपस्थित होते.
आपला मुद्देमाल परत मिळाल्याने फिर्यादी विजय टोंगे यांनी वणी पोलिसांचे आभार मानले.